Friday, 12 February 2016

निरोप "माझ्यातला तूला"

निघावं म्हणते येथून...खूप अंधार झाला आहे...
हो आपल्या नात्यामध्ये खूप अंधार झाला आहे.
माझे भविष्य तर नाहीच पण माझा वर्तमान ही मला पुसटसा सुद्धा दिसत नाहीये या नात्यात.माझी स्वप्न सत्याच्या उजेडाने झाकून जात आहेत....आणि आता हे सत्य स्वीकारण्या खेरीज इतर कोणताही पर्याय मला दिसत नाही.
 मी थांबले होते,खूप वेळ ही घेतला ...पण आता वेळ निसटून जायच्या आत मला सावरलं पाहिजे,माझ्या पंखांना पुन्हा बळ दिले पाहिजे.मला उडायचे आहे ,तुझ्या बरोबर किव्हा तुझ्या शिवाय.मुक्त व्हायचे आहे आणि मुक्त भरारी ही घ्यायची आहे.कोणीतरी परतले ही वाट मी आता नाही बघू शकत...ती आस ही मी सोडली आहे  आणि इच्छा ही. 
माझ्या स्वप्नाचे तुकडे ही मी वेचनार नाही ,कारण आता नकोत मला ती अर्धवट स्वप्ने. नवीन स्वप्ने बघायला स्वतःला तयार करत आहे मी,आणि पाहीन ही .स्वतःसाठी...स्वतःच्या आनंदासाठी...आणि तोच आता जास्त महत्वाचा आहे.  शेवटी प्रत्येक जण आपला मार्ग निवडतो,आणि मीहि तेच करणार आहे. 

....आता मला निरोप घ्यायचा आहे... तुझा नाही "माझ्यातल्या तुझा".
                                                     -रश्मी

Friday, 5 February 2016

एक चित्रकार

खूप उशीर झाला होता आज घरी जायला...दहा वाजत आले होते.मी गेले आणि बस स्टॉप वरच्या बाकावर बसले....शेजारी तरुण मुलगा बसला होता ...मी विचारले त्याला स्वारगेट ची बस गेली का?"नाही" ...एवढेच म्हणाला.Struggler होता बहूतेक. हातात एक file होती आणि त्यावर एका कागदावर काहीतरी रेखाटत होता.
    सगळीकडे शांतता होती फक्त .....तो चित्र रेखाटत होता आणि मी आपला मोईबल बघत बसले.तरीही मनात हाच विचार येत होता की कोण असावा हा,काही  दुःख असेल का याला?
 इतक्यात एक गाडी समोरून येताना दिसली...तिने थांबवली ती गाडी बस स्टॉप पाशी.एक साधी पण सुदंर साडी घातली होती तिने.तिच्या गळ्यातले ते मंगळसूत्र माझ्या नजरेतून नाही चुकले.नुकतेच लग्न झाले असावे तिचे....पण चेहऱ्याचे तेज डोळ्यात नव्हते दिसत तिच्या.
गाडी थांबलेली पाहून तो  मुलगा उठला आणि तिच्या समोर जाऊन थांबला.त्यांची नजरा-नजर झाली.असे वाटत होते सगळे डोळ्यांनीच बोलत आहेत दोघे.
दोन मिनिटं झाल्या नंतर फक्त दोनच शब्द बोलली ती "Happy Birthday"... इतकेच बोलून ती निघाली...तिची गाडी दिसेनाशी होई पर्येंत तो रस्त्याकडे बघत राहिला एकटक.
आता परत तो बाकावर येऊन बसला.आता त्याने हातात परत ती file नाही घेतली,फक्त एकटक रस्त्याकडे बघत बसला.डोळ्यात अश्रू भरलेले होते.
मला काहीच कळाले नाही.खूप प्रश्न पडले.. कोण होती ती?,एवढ्या उशिरा इतकेच बोलायला का आली असेन? असे आणि अजून काही.
 आणि मग एक बस अली ,तो उठला आणि file घेतली आणि त्या बस मध्ये चढला. पण ते पान निखळून खाली पडले,त्याला हाक देणार तो पर्यंत बस गेली होती.मी पाहिले तर त्या कागदावर एक चित्र होते ,हो तिचेच होते ते....अगदी जशी आली होती तशीच....फक्त एक फरक होता, चित्रात मंगळसूत्र नव्हते तिच्या गळ्यात.मी एकदम शांत झाले ...माझ्याच डोळ्यात अश्रू आले आणि एक थेंब त्या चित्रातवर पडला आणि त्यामध्येच  झिरपवून गेला.
प्रेम तिचे होते आणि त्याचे ही.... दुःख त्याला होते आणि तिला ही....
हा चित्रकार मला नकळत काही शिकवून गेला...जणू ते चित्र माझ्या साठीच ठेवून गेला.
(c)Rashmi Deshpande.

                                                             -रश्मी

Tuesday, 2 February 2016

शब्द माझे

असेल मी किव्हा नसेल मी...पण माझे शब्द असतील...हो कदाचित ते शब्द असतील...
मनातल्या भावनांच्या शाई मध्ये भिजलेले....
कधी कागदावर उमटलेले,तर कधी मनातच राहिलेले,
कधी तुझ्या पर्यंत पोहचलेले,तर कधी वाटेतच हरवलेले.
कधी तुझ्या डोळ्यांच्या कडा भिजवलेले,तर कधी तूला पोट भरून हसवलेले.
कधी कोपर्यात एकटेच पडलेले,तर कधी आकाशात भरारी घेतलेले.
कधी तू हृदयाला घट्ट कवटाळलेले,तर कधी तुच पायदळी तुडवलेले.
कधी संवादाचे कारण बनलेले, तर कधी वादाचे.....
असे काही माझे शब्द नक्की असतील,मी असो वा नसो.